Akshargranth
लव्ह अँड रेव्होल्युशन : फ़ैज़ अहमद फ़ैज़ : अधिकृत चरित्र Faiz Ahmad Faiz
लव्ह अँड रेव्होल्युशन : फ़ैज़ अहमद फ़ैज़ : अधिकृत चरित्र Faiz Ahmad Faiz
Faiz Ahmad Faiz by Ali Madeeh Hashmi, Translator - Shekhar Deshmukh, Lokvadmay Grih
Love and Revolution: Faiz Ahmed Faiz: The Authorized Biography in Marathi Edition
लव्ह अँड रेव्होल्युशन हे अलीकडच्या कालखंडातलं एका लोकोत्तर उर्दू कवीचं सर्वसमावेशक म्हणता येईल, असं पहिलं चरित्र आहे. या चरित्रात, चळवळीतील कार्यकर्ता, क्रांतीचा पाठीराखा, कुटुंबवत्सल गृहस्थ, जगण्यावर निरतिशय प्रेम करणारा मर्मज्ञ आदी कवितेअल्याडपल्याडच्या व्यक्तित्वपैलूंचं रेखाटन करण्यात आलं आहे.
फाळणीमुळे वाट्याला आलेल्या दाहक अनुभवांचा फैज़ यांनी आपल्या कवितांद्वारे अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तान नावाच्या नव्या राष्ट्रात त्यांनी सांस्कृतिक दूत म्हणूनच नव्हे, तर पत्रकार या नात्यानेही आपली जबाबदारी नेटाने पार पाडली. फ़ैज़ हे शोषणाविरोधात उभे ठाकणाऱ्या असहमतीदारांचा बुलंद स्वर होते. दबावापुढे झुकण्यास नकार देणारा सामान्यांचा आवाज होते. संस्कृती आणि कलाविषयक संस्थांच्या उभारणीत मोलाचं योगदान दिलेले सजग नि सृजनशील धुरीण होते. जग बदलण्याचा पक्का इरादा असलेले शिक्षणतज्ज्ञ होते. फ़ैज़ यांना ‘निशान-ए- इम्तियाज़’ हा पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान मरणोत्तर बहाल करण्यात आला. मात्र, हयात असताना, साम्यवादी विचारांमुळे आणि हुकूमशाही व्यवस्थेविरोधात उघडपणे भूमिका घेतल्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगात डांबण्यात आलं आणि देहदंडाच्या धमक्याही देण्यात आल्या.
फ़ैज़ यांच्या नातवाने लिहिलेलं हे चरित्र, कुटुंबीय आणि आप्तेष्टांनी उलगडलेल्या आठवणी, काही दुर्मिळ पत्रं आणि स्थल-कालदर्शक छायाचित्रं इत्यादींच्या माध्यमातून श्रेष्ठ कवी असलेल्या फ़ैज़ यांच्या मनोविश्वात डोकावण्याची बहुमोल संधी देशोदेशीच्या वाचकांना उपलब्ध करून देतं.
lokvangmay books |