Akshargranth
Babhulkand by Aishwarya Patekar
Babhulkand by Aishwarya Patekar
Couldn't load pickup availability
बाभूळकांड । ऐश्वर्य पाटेकर Babhulkand by Aishwarya Patekar
गाव आणि शेतीशी निगडित विविध प्रकारच्या ताणतणावाचे बहुमिती दर्शन हा पाटेकरांच्या कथेचा संदर्भपट आहे. माणसामाणसांमध्ये निर्माण झालेला अविश्वास आणि फसवणूक वाट्याला आलेल्या माणसांच्या या हतबलकथा आहेत. शहर आणि गाव व दोन पिढ्यांमधील अंतराचा तणाव या कथाचित्रणात आहे. त्यास दारिद्र्य आणि दुष्काळाचे संदर्भ आहेत. शाळकरी मुलांच्या नजरेने बदलते गावजीवन न्याहाळल्यामुळे त्यास विश्वसनीयता आणि भावकोमलतेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आस्था आणि दुरावा, ओलावा आणि स्वार्थ, विश्वास आणि अविश्वास अशा परस्परविरुद्ध ध्रुवावर असणाऱ्या माणसांच्या या कथा आहेत. तसेच ही कथा मातीलोभाचीही कथा आहे. मात्र शेतीची पडझड व शेतीमालकीतील फसवणुकीमुळे माणसांच्या वाट्याला आलेल्या घुसमटीचे पदरही या कथेत आहेत. बाभूळकांडसारख्या प्रतीकात्मक कथेला आजचे आणि उद्याचे संदर्भ प्राप्त करून दिले आहेत. या कथेतील करुण अशा मरणचित्रांमुळे या कथेचे मरणकथा असेही वर्णन करता येईल. जिवलग मैत्रिणींच्या मायाळू शोकांतकथेस ग्रामीण जीवनाचे संदर्भ आहेत. पाटेकरांच्या कथेतील मरणचित्रे परिस्थिती, भावस्थिती व दारिद्र्यामुळे निर्माण झालेली आहेत. तसेच शेतीसमूहाच्या श्रद्धाविश्वात वसत असलेली नीतिभान दृष्टी या कथनामागे आहे.
पाटेकरांची कथा कमीत कमी पात्रांची असून या आत्मनिवेदनात्म कथेवर लोकतत्त्वे व लोककथनशैलीचा प्रभाव आहे. लोककथेचा बाज असणाऱ्या या कथेत एका गोष्टीतून सुरू होणारी दुसरी गोष्ट सुरू होते. त्यामुळे तिला द्विदल कथा असेही म्हणता येईल. कथानिवेदनात वाचकांना सामावून घेतल्यामुळे या कथांना दुहेरी मिती व खुल्या कथनशक्यता प्राप्त झाल्या आहेत. परिस्थितीच्या रेट्यात आणि काचात अडकलेल्या माणसांच्या या दुःखद, अस्वस्थ, व्याकूळ अशा शोकांतकथा आहे.
– प्रा. रणधीर शिंदे
Lokvadmay Grih Prakashan |
Share
