श्री. अभिजित जोग लिखित ‘भारत : सत्य, सत्व, स्वत्व’ हा ग्रंथ म्हणजे हजारो वर्षांपूर्वी भारतीयांनी केलेल्या ज्ञानोपासनेचा व भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचा धावता आढावाच होय. ‘ज्ञान विज्ञान योग’ असे प्रस्तुत ग्रंथाचे वर्णन करता येईल. यात तत्वज्ञान, अध्यात्म, भाषा ( संस्कृत ), वैद्यक, खगोलशास्त्र, गणित, धातुशास्त्र या ज्ञान-विज्ञानाच्या सर्व आयामांचा भारतातच उदय झाल्याचे सप्रमाण विवेचन केलेले आढळते. सखोल चिंतन, ‘ना मूलं लिख्यते किंचित’ हे असे धोरण, भारत म्हणजे जगातला पहिला ज्ञानाधिष्ठित समाजाचा देश, वेदोपनिषदे व सभ्यतेची मानवी मूल्ये भारतात निर्माण झाली तेंव्हा इतर देशात अज्ञानांधःकारच होता हे ठासून सांगणारा हा ग्रंथ होय.
ही अशी एकमेवाद्वितीय ज्ञानपरंपरा आठवून भारतीयांना ‘उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत’ असे सुचविणारा हा मौलिक ग्रंथ होय.